Monday, 20 April 2015

पदर

"पदर‘! काय जादुई शब्द आहे हो मराठीतला! काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. पण, केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात! किती अर्थ, किती महत्त्व... काय आहे हा पदर? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर-दीड मीटर लांबीचा भाग. तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण, आणखीही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा!

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन "अमृत‘ प्राशन करण्याचा हक्क बजावतं. जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदरच पुढं करते. मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या पदराचाच आधार लागतो. एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टॉवेलऐवजी आईचा पदरच शोधतं आणि आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. मुलानं पदराला नाक जरी पुसलं, तरी ती रागावत नाही त्याला... बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो. "छोटा भाई‘मधलं ते गाणं आठवतं का तुम्हाला? "मॉं मुझे अपनी आँचल में छुपा ले, गले से लगा ले, के और मेरा कोई नहीं!‘ भारतातल्या प्रत्येक प्रांतातल्या पदर घेण्याच्या पद्धती निराळ्या. कुठं डोक्‍यावरून पदर घेतात, कुठं डोक्‍यावरून घेऊन चेहराही झाकला जातो, काही ठिकाणी दोन्ही खांद्यांवरून, तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. महाराष्ट्रात तो डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो; तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो! काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात, तर काही जणी आपला लटका, राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात!

ओटी भरायची ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं वाण लुटायचं ते पदर लावूनच. बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्‍यावर ओढला जातो, तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब मिळते! काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच (नवरदेवाच्या उपरण्यासोबत) बांधली जाते.

"पदर‘ हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना? मुलगी वयात आली, की तिला "पदर आला‘ असं म्हटलं जातं. देवापुढं मागणं मागताना हाच पदर पसरला जातो. नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते, पण कामाचा धबडगा दिसला, की पदर खोचून कामाला लागते. देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या चुका "पदरात घे.‘ मुलगी मोठी झाली, की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते - अगं, चालताना तू पडलीस तरी चालेल. पण, "पदर‘ पडू देऊ नकोस! अशी आपली संस्कृती. या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत. "पदर सुटला‘ म्हटले, की फजिती झाली; कुणी पदर ओढला म्हटलं, की छेड काढली. कित्येक कवींनी, लेखकांनी याचा उपयोग केला आहे, अगदी अभंगापासून लावणीपर्यंत!

"पदरावरती जरतारीचा गोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात. असा हा किमयागार पदर काही वेळेस घातही करू शकतो बरं का! लोंबकळणारा लांब पदर गाडीच्या चाकात अडकून पाडू शकतो... स्टोव्ह, गॅसपाशी पेटून जिवाशी खेळूही शकतो. तेव्हा मैत्रिणींनो, जरा जपून, पदर सावरा...

Friday, 17 April 2015

आजीचे अनुभवी सल्ले

१.साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.

२.सूखे खोबरे तूरडाऴित खुपसून ठेवले तर ख़राब होत नाही.

३.रस्सा भाज्या खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारट पणा कमी होतो.

४.लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.

५.कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.

६.बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी.

७.हिंगाचा वास टिकवीण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.

८.डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा.

९.दुधाला वीरजण लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी.दही घट्ट होते.

१०.भाज्यांमध्हे मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकन्यास मदत होते.

११.भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घातले तर ती चिकट होत नाही.

१२.पुरयांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुरया बराच वेळ फुगलेल्या राहतात.

१३.छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभरा डाळही भिजवावी, त्याने छोले छान रस्सादार आणि दाट होतात.

१४.कट्ट्यावर लिम्बाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.

१५.कढ़ीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढ़ीलिम्बाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात.

१६.गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.

१७.कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता ठंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी २ दिवसांत एकदा बदलावे.

१८.पालेभाज्या शिळय़ा सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिम्बुरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.

१९.शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात २ चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोड़े परतावे. त्याने साल लवकर सुटतात.

२०.पकोड़े चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे.

२१.शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.

२२.भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.

२३.खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.

२४.एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.

२५.मिठाला पावसाळयात पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.

२६.पुदीना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो.

२७.पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोड़े लिम्बू पीळावे.

२८.शिळा ब्रेड कड़क उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.

२९.फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.

३०.रोज विशिष्ट भांड्यात आपण चाहा करतो. त्यास चहाचे डाग पडतात. ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.

३१.पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.

३२.हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे आणि हात धुतल्यानंतर वास जातो.

३३.ताक आम्बट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद

काढून टाकावे. आम्बटपणा कमी होईल.

३४.ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.

३५.ड्राई फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी १ तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.

३६.कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.

३७.कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात १ चिमटी मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.

३८.भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.

३९.पावसाळयात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा.

४०.दोस्याच पीठ हिवाळयात आम्बवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मधे पीठ ग्राइंड करताना घालावे.

४१.लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची साल लवकर सुटते.

४२.हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत.

४३.कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावा.

४४.लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पैन मधे कढवा. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते.

४५.लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजि दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.

४६.वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोडा भिजवून मिल्क पावडर व पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.

४७.करंजी, शंकरपाळ, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव। पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.

४८.अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोड़ी तांदळlची पीठी मिसळlवी.

४९.अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोड़ी साखर घालून त्यावर अनारसा थापावा.

५०.घरात किंवा स्वैपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.

५१.घराच्या कोपरया मध्ये बोरिक पावडर टाकून कॉक्रोचेस ला पळवता येइल.

५२.मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईण्ड कराव.

५३.कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.

Monday, 13 April 2015

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे

नित्यनियमाप्रमाणे दररोज न चुकता क्षितीजावर सुर्योदय होतो, सुर्योदयाचे ते रम्य दृष्य, घरट्यातून बाहेर पडणारया पक्षांचा किलबिलाट, थंड, मोकळी, प्रदुषण विरहीत हवा यांचा अनुभव घेण्यासाठी सकाळी लवकर ऊठायलाच हवे.
पण या सुर्योदयाच्या वेळेस आपणास दोन प्रकारचे लोक भेटतात, एक मस्त पैकी पांघरुणात झोपलेले व आपापल्या कामाच्या लगबगीत असणारे लोक. जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असचाल तर प्रथम आपले अभिनंदन, कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.
दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन संतुलित ठेवण्याचा चालणे हा उत्तम मार्ग आहे
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!