Monday, 18 May 2015

'अरुणा'स्त

 

42 वर्ष एक वेदना घेऊन ती जगत होती... जगत होती, किंवा कदाचित आला दिवस पुढे ढकलत होती. तिच्या संवेदना कोणीच शब्दात मांडू शकणार नाही. ती 'जगली' 24 वर्ष आणि 'मृत्युपंथावर' होती 42 वर्ष! अरुणाच्या जीवन-मृत्यूचा हा अजब खेळ 18 मे रोजी अरुणोदय झाला तेव्हा संपला.

गेली 42 वर्षांत आजूबाजूच्या जगात कितीतरी गोष्टी बदलत आहेत, पण तिच्या वर्षानुवर्षांच्या दिनक्रमात जरासाही फरक पडला नाही. नाही म्हणायला तिच्या तरुण शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्या. तिचे केस पांढरे झाले, सुरकुत्या आल्या. तिचा श्वास आणि ह्रदय सुरु होतं, मात्र तिच्यासाठी काळ 27 नोव्हेंबर 1973 च्या त्या रात्रीच थांबला.

कोण होती अरुणा?

कारवारमधल्या हल्दीपूर या छोट्याशा गावातून आलेली अरुणा मुंबईत येऊन जनसेवेसाठी नर्स झाली. केईएममध्ये नोकरी करत असताना तिथल्याच एका डॉक्टरशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांचं लग्नही ठरलं. पण तिथेच नोकरी करणार्‍या सोहनलाल वाल्मिकीनेही तिला लग्नासाठी विचारलं. तिने नकार दिल्याने त्याला राग आला.

काय झालं त्या रात्री ?

अरुणाने नकार दिल्याच्या खुनशीतूनच सोहनलालने तिच्या गळ्यात कुत्र्याची साखळी बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिच्या मानेतल्या नसा बंद झाल्या त्या कायमच्याच. तेव्हापासून तिची शक्ती, वाचा, दृष्टी, संवेदना सारं काही गेलं.

सोहनलालला पुण्यात अटक झाली, शिक्षाही झाली ती चोरी आणि खुनाच्या प्रयत्नासाठी. प्रत्येकी सात वर्षं आणि तीही एकत्र भोगायची. तो बाहेर आला आणि बदला घ्यायचा म्हणून केईएममध्ये दाखल असलेल्या तिच्या बेडची रेलिंगच काढून टाकली. खाली पडल्याने तिला जखमा झाल्या.

तिचा एकेकाळचा प्रियकर आणि भावी नवरा असलेल्या डॉक्टरने दुसरं लग्न केल होतं. तिच्या नातेवाईकांनीही तिला सोडलं होतं. तिच्यावर बलात्कार करुन तिला या अवस्थेत आणून सोडणार्‍या सोहनलालने आपली शिक्षा पूर्ण केली होती. दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये तो उजळ माथ्याने नोकरीही करत होता.

सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विराणी यांनी अरुणावर पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव 'अरुणाज स्टोरी'. हेच पुस्तक मराठीत अक्षर प्रकाशनाने 'अरुणाची गोष्ट' या नावाने आणलं. विनय आपटे यांनी 'कथा अरुणाची' हे नाटक रंगमंचावर आणलं.

ज्या केईएम रुग्णालयात माणुसकीशून्य सोहनलाल होता, त्याच ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या नर्स आणि डॉक्टर्सही होते. केईएमच्या मॅनेजमेंट, डॉक्टरांनी आणि सर्वांनीच तिला आपलं मानलं आहे. तिच्यावर एवढी वर्षं उपचार सुरु आहेत. पण त्यात उपकारांच्या भावनेचा लवलेशही नाही.

तिला दयामरण देण्याची मागणी झाली तेव्हा देशात वादळ उठलं. सुप्रीम कोर्टाने तिच्या दयामरणाचा प्रश्न निकाली काढला आणि केईएममधल्या नर्सनी जल्लोष साजरा केला.

अरुणाबरोबर काम करणार्‍या नर्सेस केव्हाच रिटायर झाल्या आहेत. पण नंतरच्या पिढीनेही तिचा प्रेमाने सांभाळ केला आहे. ती खोली गेली 42 वर्षं राखीव आहे.

अरुणा यांच्या मृत्यूने एका पर्वाचा अंत झाला. अरुणामुळे देशाला दयामरणाचा कायदा मिळाला. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रुपाने अरुणा तिचा सेवाभाव पुरवतच राहिली. ती गेली आणि सकाळीच 'अरुणा'स्त झाला.

No comments:

Post a Comment