Monday, 20 April 2015

पदर

"पदर‘! काय जादुई शब्द आहे हो मराठीतला! काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. पण, केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात! किती अर्थ, किती महत्त्व... काय आहे हा पदर? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर-दीड मीटर लांबीचा भाग. तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण, आणखीही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा!

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन "अमृत‘ प्राशन करण्याचा हक्क बजावतं. जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदरच पुढं करते. मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या पदराचाच आधार लागतो. एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टॉवेलऐवजी आईचा पदरच शोधतं आणि आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. मुलानं पदराला नाक जरी पुसलं, तरी ती रागावत नाही त्याला... बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो. "छोटा भाई‘मधलं ते गाणं आठवतं का तुम्हाला? "मॉं मुझे अपनी आँचल में छुपा ले, गले से लगा ले, के और मेरा कोई नहीं!‘ भारतातल्या प्रत्येक प्रांतातल्या पदर घेण्याच्या पद्धती निराळ्या. कुठं डोक्‍यावरून पदर घेतात, कुठं डोक्‍यावरून घेऊन चेहराही झाकला जातो, काही ठिकाणी दोन्ही खांद्यांवरून, तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. महाराष्ट्रात तो डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो; तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो! काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात, तर काही जणी आपला लटका, राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात!

ओटी भरायची ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं वाण लुटायचं ते पदर लावूनच. बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्‍यावर ओढला जातो, तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब मिळते! काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच (नवरदेवाच्या उपरण्यासोबत) बांधली जाते.

"पदर‘ हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना? मुलगी वयात आली, की तिला "पदर आला‘ असं म्हटलं जातं. देवापुढं मागणं मागताना हाच पदर पसरला जातो. नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते, पण कामाचा धबडगा दिसला, की पदर खोचून कामाला लागते. देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या चुका "पदरात घे.‘ मुलगी मोठी झाली, की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते - अगं, चालताना तू पडलीस तरी चालेल. पण, "पदर‘ पडू देऊ नकोस! अशी आपली संस्कृती. या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत. "पदर सुटला‘ म्हटले, की फजिती झाली; कुणी पदर ओढला म्हटलं, की छेड काढली. कित्येक कवींनी, लेखकांनी याचा उपयोग केला आहे, अगदी अभंगापासून लावणीपर्यंत!

"पदरावरती जरतारीचा गोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात. असा हा किमयागार पदर काही वेळेस घातही करू शकतो बरं का! लोंबकळणारा लांब पदर गाडीच्या चाकात अडकून पाडू शकतो... स्टोव्ह, गॅसपाशी पेटून जिवाशी खेळूही शकतो. तेव्हा मैत्रिणींनो, जरा जपून, पदर सावरा...

No comments:

Post a Comment