Tuesday, 13 January 2015

बनारसी मलाइयो

थंडीच्या दिवसात पहाटेच्या वेळी ‘दव’ पडतं. या दवाच्या मदतीने कुठला पदार्थ बनू शकतो ? तर हो. देशाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या वाराणसीमध्ये दवाच्या मदतीने “बनारसी मलाइयो” नावाची मिठाई बनवली जाते. वाराणसीमध्ये अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण मिठाया बनवल्या जातात पण त्यात सगळ्यात वरचा क्रमांक लागतो तो या मालाइयोचा. बाकी मिठाया इतरत्रही आता बनू लागल्या आहेत पण ही मिठाई फक्त वाराणसीतच बनवली जाते. या मिठाईचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही मिठाई बनवताना दवबिंदूंचा वापर केला जातो. आणि दवबिंदूंचा वापर या मिठाईत केला जात असल्याने ही बनारसी मलाइयो मिठाई ऐन हिवाळ्याच्या तीन महिन्यातच बनवली जाते. ही मिठाई तयार करण्याची पद्धत इतर मिठायांपेक्षा वेगळी आहे. ही मिठाई तयार करण्यासाठी कच्चं दूध आधी मोठ्या कढईत उकळलं जातं आणि मग रात्री मोकळ्या आकाशाखाली या दुधाला ठेवलं जातं. पहाटे या दुधात दव पडतं, त्यामुळे त्यात फेस तयार होतो. सकाळी मिठाई बनवण्याच्या पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होते. सकाळी हे फेसाळ दूध रवीने घुसळलं जातं. मग त्यात वेलची, केशर, सुकामेवा घालून परत ते मिश्रण रवीने घुसळलं जातं.

ही मलाइयो मिठाई कुल्हडमध्ये म्हणजेच छोट्या छोट्या मातीच्या मडक्यात घालूनच खायला दिली जाते. दवबिंदूंच्या सहाय्याने तयार केलेली ही मिठाई आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्याला खूप चांगली असते. दवबिंदूंमध्ये नैसर्गिक मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात. आणि दव जेवढं जास्त पडतं, तेवढी ही मिठाई जास्त आरोग्यवर्धक बनते.
फक्त तीन महिने ही मिठाई मिळत असल्याने या तीन महिन्यात या मिठाईवर खवय्यांच्या अक्षरशः उड्या पडतात. दुपारचे बारा वाजेपर्यंत मिठाई संपलेली असते आणि एकदा मिठाई संपली की मग मलाइयो खाण्यासाठी पुढच्या सकाळपर्यंत थांबावं लागतं. आबालवृद्धांपासून सर्वांना आवडणारी ही मिठाई परदेशी पर्यटकांनाही फार आवडते. ही मिठाई खाणाऱ्यांमध्ये या परदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय असते.
ही मिठाई गंगा किनारी असलेल्या लोकवस्तीत, जुन्या वाराणसीत जिथे घनदाट लोकवस्ती आहे अशा भागांमध्ये विकली जाते.
ही मिठाई वाराणसी सोडून काही मोजक्या ठिकाणीही मिळते पण तिथे ही मिठाई बनवणारेही वाराणसीवालेच...

No comments:

Post a Comment