Sunday, 25 October 2015

कोजागिरी पौर्णिमा

!! शरद पौर्णिमा / कौमुदी पौर्णिमा / कोजागिरी पौर्णिमा !!

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी दूध आटवून केशर, पिस्ता बदाम घालून माता लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्री पर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. 
आश्विनी पौर्णिमेस हे नाव असून ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला 'कोजागरव्रत' म्हणतात, दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी,पूजेनंतर देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावेत, असा हया व्रताचा विधी सांगितला आहे.
रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. या रात्री लक्ष्मी 'को जागर्ति' (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत्कुमार संहितेत हया व्रताची कथा दिली आहे. 


प्राचीन काळी याच दिवशी 'कौमुदी महोत्सव' साजरा करीत. 'कौमुदी पौर्णिमा' व शरत्पौर्णिमा' अशीही नावे हया दिवसास आहेत, पावसाळयानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्व आले असावे. 

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनी फुललेला असतो.


ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. त्या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवल रंगी उत्सव गणला जातो. या दिवशी नाचायचे, बागडायचे, गायचे, रास, गरबा खेळायचा. या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची आश्विनी करतात. मुलाला अंघोळ घालतात. जेवणात काही तरी गोड पदार्थ करतात. सायंकाळी प्रथम देवाला नंतर चंद्राला औक्षण करुन मुलाला ओवाळतात. विशेषत: महाराष्ट्रात हा प्रघात आहे.

! “ दिवा सूर्योंशुसंतप्तं रात्रौ चन्द्रांशुशीतलम्
कालेन पक्वं निर्दोषमगस्त्ये नाविषीकृतम्!!
"हंसोदकमिति" ख्यातं शारदं विमलं शुचि!
स्नानपानावगाहे षु शस्यते तद्यथाऽमृतम्!
शारदानि च माल्यानि वासांसि विमलानि च!
शरत्काले प्रशस्यन्ते प्रदोषे चेन्दुरश्मयः!! " -
अर्थ -
हंस शब्दाने सुर्य व चंद्राचे ग्रहण (संपादन) होते.
या दोन्हीच्या किरणांनी संपर्काने शुद्ध जल
"हंसोदक" म्हंटले जाते.
दिवसा सुर्याच्या किरणांनी तप्त व
रात्री चंद्राच्या किरणांनी शीतल,
अगस्त्योदयाच्या प्रभावाने विषरहित तसेच
कालाच्या प्रभावाने अम्लता आदि दोष रहित
परिपक्व निर्मल व पवित्र जल हंसोदक आहे याचे
या दिवशी फार महत्व आहे. या जलात स्नान
केल्याने अमृत समान फल प्राप्त होते.

कोजागिरी व्रत -
आश्विन पौर्णिमेला ऐरावतावर आरुढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी, उपवास करावा. गंध-पुष्पांनी पूजिलेले व तुपाचे शंभर दीप लावून देवमंदिर, तुलसी वृंदावन इत्यादी ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान करुन पूजा करावी. घृतशर्करामिश्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा, वस्त्रे, दीप दान करावे, असे केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते, असे म्हटले आहे.

!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

No comments:

Post a Comment