Friday, 18 December 2015

खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.


पु.लं.चं 😊......
                     
खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. 
रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. 
उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! 
तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! 
जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.

खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. 

रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं. सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. 

बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. 

अधिकचं हे असं आहे. 
लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. 
हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. 
शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. 
मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. 
आणि चहाबरोबर भलतंच खातात.. 
आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे.

खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. 

ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. 
उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. 

लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. 

माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई.

सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे. 

होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. 
दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. 
संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. 
कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. 
गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? 
रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... 
सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. 
हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. 
पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.

(पु. ल. देशपांडे) 

शुभ खाद्यान्न ! 

No comments:

Post a Comment